24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeमहाराष्ट्रमेटेंच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी होणार

मेटेंच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानंतर आता मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस महासंचालकांना दिला.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या २ तासांत काय झाले, याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सीआयडी चौकशीचे आदेश दिले.

विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते.

त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले.

मेटेंच्या भाच्याचा चालकावर संशय
विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या वाहन चालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, वेगवेगळा जबाब देत आहे, असा आरोप मेटेंच्या भाच्याने केला. त्यामुळे तोही संशयाच्या भोव-यात अडकला आहे.

शिवसंग्रामचे कार्यकर्ते आक्रमक
विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी न झाल्यास शिवसंग्रामकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या