मुंबई : राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ््यातील आरोपीची चक्क यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली. संतोष वेणीकर असे या अधिका-याचे नाव आहे. या अजब कारभाराची चर्चा चांगलीच रंगली आहे.
विशेष म्हणजे या घोटाळा प्रकरणी संतोष वेणीकर यांना वर्षभर तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र, कोरोनानंतर त्यांना जामीन मिळाला. त्याचे त्यांनी सोने केल्याचे समोर आले. नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी राज्यात गाजलेला कृष्णूर धान्य घोटाळा १८ जुलै २०१८ रोजी उघड केला होता. त्यांनी धान्य घेऊन जाणारे १९ ट्रक पकडले. त्यात स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे गहू, तांदूळ होते. या प्रकरणी सर्व पुरावे जमा झाल्यानंतर १९ जणांविरुद्ध दोषारोपत्र दाखल झाले होते. धान्य घोटाळ््यादरम्यान कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे, तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार चिंतामण पांचाळ, गोदामपाल अनिल आंबेराव या चौघांना निलंबित करण्यात आले होते.
कृष्णूर धान्य घोटाळा घडला, त्यावेळी नांदेडच्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदी संतोष वेणीकर होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर ते साडेतीन वर्षे भूमिगत होते. मात्र, पोलिसी दट्ट्याने ते १६ जून २०२२ शरण आले. वेणीकरांना एक वर्ष तुरुंगात घालवावे लागले. कोरोनानंतर ते जामिनावर बाहेर आले.
वेणीकरांवर सरकार मेहरबान!
आता कृष्णूर घोटाळा प्रकरणाचा समितीने आढावा घेतला. त्यानंतर आश्चर्यकारकरित्या संतोष वेणीकर यांची महसूल खात्यात अकार्यकारी पदावर नेमणूक करण्याची शिफारस झाली. आता त्यांना यवतमाळ येथे भूसंपादन लाभक्षेत्राचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.