24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रनैराश्यापोटी देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही : शरद पवार

नैराश्यापोटी देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही : शरद पवार

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या अधिका-यांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. त्यासोबतच अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत आम्हाला या चौकशीची चिंता नसल्याचे म्हटले आहे. शरद पवारांनी म्हटले, अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठी होत आहे.

या गोष्टी आम्हाला नव्या नाहीत, या गोष्टीची आम्हाला कसलीही चिंता नाही. देशमुखांच्या चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न तयार झाला आहे. अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव काल ज्या पक्षाने मांडला. त्या पक्षातर्फे ज्यांनी मांडला ते बुद्धिमान गृहस्थ आहेत असं म्हणून शरद पवारांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक ईडीच्या ताब्यात
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी शुक्रवारी सकाळच्या सुमारास ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकूणच संपूर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

लोक देखील त्याची गांभीर्याने दखल घेत नाहीत
जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील यापूर्वी आपण कधी हे पाहिले नव्हते. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

राजकीय हेतू नाही : फडणवीस
अनिल देशमुख यांच्या कारवाईवरून संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरू आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही, असेही फडणवीस म्हणाले. न्यायालयाने सोपवलेल्या जबाबदारीनुसारच केंद्रीय तपास यंत्रणा आपले काम करत आहेत.

करावे तसे भरावे : नारायण राणे
ईडीची कारवाई ही राजकीय कारवाई नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तर यावर राजकारण करूच नये, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. करावे तसे भरावे या प्रमाणे आता भरण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काही सापडत नाही म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. १० वर्षांपूर्वीचे प्रकरण बाहेर काढून त्यावरून एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची याचाच अनुभव सर्वांना येत आहे. मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ही पध्दत असून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आणीबाणीची आठवण : सुप्रिया सुळे
यंत्रणेचा गैरवापर हे भाजपाचे स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतेय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

तिन्ही तपास यंत्रणांचा दुरुपयोग : सचिन सावंत
लोकशाही वाचवण्यासाठी मविआ सरकारला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव तीनही पक्षांनी हाणून पाडला पाहिजे. विरोधकांचा छळ करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आरोपकर्ते आर्थिक देवाण-घेवाण झाली नाही असे म्हणत असतानाही अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करणा-या इडीने उत्तर द्यावे. असे सचिन सावंत म्हणाले.

प्रकरण न्यायप्रविष्ट : गृहमंत्री वळसे-पाटील
या संदर्भात मी काही बोलण्याची गरज आहे, असं वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. असे गृहमंत्री वळसे-पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले. तसेच, मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहेत, असेही त्यांनी सांगितले.

चित्रपट आणि सेन्सॉर बोर्ड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या