24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रशिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

शिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.१६ (प्रतिनिधी) राममंदिरासाठीच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपांचा निषेध करण्यासाठी शिवसेना भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये व शिवसैनिकांमध्ये आज जोरदार राडा झाला. यामुळे शिवसेना-भाजपातील संघर्ष वाढला असून आरोप-प्रत्त्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान हल्ला करणाऱ्या शिवसेना आमदार व नगरसेवकांवर गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी नंतर भाजपाने माहीम पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपामुळे देशभर खळबळ उडाली आहे. शिवसेनेकडूनही यावरून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’मधूनही या कथित घोटाळ्यावरून तिखट शब्दात टीका करण्यात आली होती. या टीकेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी व शिवसेनेच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने आज शिवसेना भवनासमोर आंदोलन केले.

शिवसेना भवनासमोर भाजपाने आंदोलन सुरु केल्याची माहिती मिळताच तेथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीला प्रत्त्युत्तर देण्यास सुरुवात झाली व वातावरण तापले. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते भिडले व जोरदार हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना पांगवले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी माहीम पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. दोन तासांच्या आंदोलनानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगावर आले तर शिंगावर घेणारच
शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्याबद्दल भाजप-शिवसेनेने परस्परांना जबाबदार धरले. शिवेसना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती असा आरोप स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी केला. भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शांतपणे आंदोलन केलं असतं तर आम्ही कुठलाही आक्षेप घेतला नसता. हे भाजपनं जाणूनबुजून केलं आहे. अंगावर आले तर शिंगावर घ्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

जशाला तसे उत्तर मिळेल -भाजप
शिवसेनेने राम मंदिर भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केले असून, सत्तेत राहण्यासाठी शिवसेना कॉंग्रेसच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. महिला कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. असली गुंडगिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, यापुढे जशाला तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला.

नांदेड जिल्हा परिषद सभेला निषेधाचे ग्रहण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या