नाशिक : नाशिकमधून आता शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर शिवसेनेला एकप्रकारे उतरती कळा लागली आहे. राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. नाशिकमधून आता शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ शिंदे गटात सामील झाले आहेत.
एकीकडे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. यात त्यांना जिल्हाभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र तत्पूर्वी आमदार दादा भुसे, सुहास कांदे यांच्याबरोबर खासदार हेमंत गोडसे यांनीही शिवसेनेला धक्का दिला. त्यानंतर आता इगतपुरी तालुक्यातून शिवसेनेला दुसरा धक्का बसला असून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे शिंदे सेनेत दाखल झाले आहेत.
दरम्यान नाशिकच्या दोन आमदार, एक खासदारानंतर आता माजी आमदार असलेले काशिनाथ मेंगाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
शिवसेनेचे जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ तोकडे, घोटी ग्रामपालिकेचे माजी सरपंच संजय आरोटे, माजी सरपंच खंडेराव धांडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात सामील झाले आहेत.