ठाणे : आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही आता जायला लागले आहेत, त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करणार आहेत.
या शिवसंवाद यात्रेदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच जाणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेकडे लागले आहे.
आजपासून आदित्य ठाकरे ३ दिवसांच्या शिवसंवाद यात्रेसाठी निघाले आहेत. या यात्रेची सुरुवात भिवंडीतल्या मेळाव्याने झाली आहे. या यात्रेसाठी निघताना धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ठाणे इथून शिवसैनिकांचे स्वागत स्वीकारून आदित्य ठाकरे पुढे जाणार आहेत.
तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, औरंगाबाद आणि अहमदनगरमधील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या दुस-या दिवसाची सुरुवात मनमाडमधील मेळाव्यापासून होईल. तिस-या दिवशी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. पैठण, गंगापूर, नेवासा येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर शिर्डीमध्ये शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल.