नागपूर : सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले आहे.
याला आता खासदार नवनीत राणा यांनी उत्तर दिले आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील, असे वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
तीन वर्षांनंतर नागपुरात पहिले अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकारमुळे होत आहे. उद्धव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठी कामे सांगितली तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षांचा पगार मी संजय राऊत यांना देईन, असे खासदार राणा म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व कामे तोंडपाठ आहेत. पण उद्धव ठाकरे यांना एकही प्रस्ताव तोंडपाठ नाही. जनतेला काम हवे आहे. आरोप-प्रत्यारोपांसाठी अधिवेशन नाही, जनतेच्या पैशातून अधिवेशनात खर्च केला जातो. कोणता बॉम्ब कोण फोडेल यात जनतेला रस नाही.
खूप सारे विषय आहेत. काम करताना चुका प्रत्येक व्यक्तीकडून होतात. जर ते पकडायला सुरुवात केली तर त्यांना हे जड जाईल, असा इशारा देत देवेंद्र फडणवीस यांना फटाके फोडण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यांना कामात इंटरेस्ट आहे. समृद्धी महामार्ग, वैद्यकीय काम अशी व्हिजन यात दिसत असल्याचे खासदार राणा म्हणाल्या.