जगद्गुरूंसोबत विठुरायाचेही दर्शन
देहू : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतले. तब्बल २४ वर्षांनंतर शरद पवारांनी तुकाराम महाराज मंदिरात पाऊल ठेवले आहे. तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात शरद पवारांनी विठू माऊलीचेही दर्शन घेतले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. शरद पवार यांचा तुकाराम महाराज यांची पगडी घालून सत्कार करण्यात आला. मी देव-दानव यापासून लांब असतो. पण काही देवस्थान अशी आहेत, जी अंत:करणात आहेत, त्यापैकी एक म्हणजे शेगाव. आळंदी, देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळते, असे शरद पवार या कार्यक्रमात म्हणाले.
मागच्या ४०० वर्षात समाजात बदल घडवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले आहे. ४०० वर्षे तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली, त्यामुळे इतर कोणाचे नाव घ्यायचे काही कारण नाही. मोरे घराणे हे मूळ घराणे आहे, त्यांनी सुचवले की संताच्या जीवनावर आधारित दूरचित्रवाणी दाखवा. येत्या आठवड्यात यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी त्यांना बोलावले आहे. दूरचित्रवाणीद्वारे इतिहास पोहोचवण्याची पावले उचलूयात, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.