जालना : शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर आज ते शिंदे गटात सामील दाखल झाले आहेत.
जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरला तर मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यावेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. दरम्यान, जालना सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा लिलावाशी संबंधित प्रकरणात ‘ईडी’ने कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, जमीन आदी जप्त केली असल्याची माहिती ‘ईडी’ने दिली होती. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी या साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथे काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली होती.