मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या नाट्याचे दररोज वेगवेगळे अंक सादर होत आहेत. राष्ट्रवादीत खडसे येणार, येणार अशी हाकाटी पत्रकारांसह अनेक बडे नेते देत होते. मात्र अचानक खडसे यांनी नकार देत सर्वांनाच तोंडघशी पाडले. त्यामुळे खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधून स्पष्ट बोलणे टाळले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याचीच प्रचिती दिली. खडसे राष्ट्रवादीत कधी येणार याबाबत पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी चक्क हात जोडून काहीही बोलण्यास नकार दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सोलापूरच्या दौ-यावर आहेत. दौ-यांपूर्वी पत्रकारांनी त्यांच्याकडून खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न येताच अजित पवारांनी सरळ हात जोडले. मला याविषयी काहीच माहीत नाही. ज्या गोष्टीची माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसे काय सांगणार?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे बाजूला फेकले गेलेले एकनाथ खडसे पक्षांतराच्या निर्णयाप्रत आले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते भाजपला धक्का देतील, असेही बोलले जात होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. आता ते दस-याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करतील, असे बोलले जात आहे. याच विषयी अजित पवारांना विचारण्यात आले होते. मात्र, त्यांनी हा प्रश्न खुबीने टाळला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसेंच्या सोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे व काही आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपच्या राज्यकार्यकारिणीत पदाधिकारी आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा यावर मंथन सुरू आहे.
भक्तांच्या नवसाला पावणारी खुर्दळीची जनमाता देवी