कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचे पावित्र्य सध्या धोक्यात आले आहे. पन्हाळगडावर पर्यटकांकडून चक्क दारूची पार्टी होत असतानाचा व्हीडीओ आता समोर आला आहे. पन्हाळगडावर पर्यटकांसाठी जेवणासाठी असलेल्या झुणका-भाकर केंद्रात ही ओली पार्टी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचे व्हीडीओच्या माध्यमातून दिसत आहे. अशा पार्ट्यांकडे पोलिस व पुरातत्त्व विभाग लक्ष का देत नाही म्हणत शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. शिवप्रेमींनी अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवप्रेमींकडून पार्टी करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यासोबत दुस-या बाजूला येथील झुणका-भाकर केंद्राकडून या पार्ट्यांसाठी विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्याचेही व्हीडीओमधून दिसत आहे. त्यामुळे या झुणका-भाकर केंद्रावर देखील कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पन्हाळागडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकोट किल्ल्यांचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन होत नसल्याचे चित्र आहे. मात्र आता या गडावर अनधिकृतपणे सर्रास ओल्या पार्ट्या होताना पाहायला मिळत आहे.
स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपले रक्त सांडून पवित्र केलेल्या या जमिनीवर बसून पर्यटक दारू पार्टी करत आहेत आणि यांना साथ देखील गडावरील झुणका-भाकर केंद्रचालक देत आहेत.
यामुळे आता या झुणका-भाकर केंद्रावर आणि पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.
पन्हाळगडावरील पुरातत्त्व विभाग या गडाकडे लक्ष देत असल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे. तसेच या पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील एक बुरूज कोसळला आहे. यामुळे आता या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन आणि पावित्र्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.