22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू होणार !

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू होणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२५ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसीबीसी प्रवर्गाचे आरक्षण न ठेवता हे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असले तरी, आरक्षणाचा निर्णयाला अधीन राहून ही प्रक्रिया केली जाईल, असे याबाबत जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन याबाबतची याचिका घटनापीठाकडे पाठवली आहे. मराठा आरक्षणचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी मराठा संघटनांनी लावून धरली होती. घटनापीठाचा अंतिम निर्णय होईपर्यंत मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे सर्व शैक्षणिक प्रवेशही थांबले होते. परंतु स्थगितीच्या प्रयत्नांना यश येत नसल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आरक्षणाला स्थगिती असल्याने एसीबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या प्रवेशासाठी आरक्षण असणार नाही. पण त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत अशा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयास अधीन राहून होईल,असे शासनआदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आज मंत्रालयावर मोर्चा !
मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलावीत या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण त्याचे लाभ मराठा समाजातल्या तरूणांना मिळत नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही भरती अथवा प्रवेश प्रक्रिया करू नये अशी आग्रही भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे.

कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करा; अन्यथा दंडात्मक कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या