अमरावती : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर फक्त अपक्ष आमदार नाराज नसून सर्वच पक्षांचे आमदार नाराज आहेत. मंत्र्यांना टक्केवारीचा मोह आहे. तर मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. याविरोधात फक्त अपक्ष आमदारच बोलू शकतात.
पक्षातील आमदार हे बोलून दाखवू शकत नाहीत. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि लोकांना कशाची गरज आहे हे समजून कारभार करावा अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर पत्रकार परिषदेद्वारे केली.
मुख्यमंत्री औरंगाबाद येथे सभा घेत आहेत मात्र त्या सभेपूर्वी त्यांनी लोकांसोबत बोलून पाण्याची समस्या जाणून घ्यावी आणि नंतर सभा घ्यावी असा टोलाही राणा यांनी लगावला. अमरावती येथील मेळघाटमधील पाण्याची समस्या बिकट आहे. तीन वर्षांत मी तीनशे कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी आणले. मेळघाटमध्ये ‘प्रत्येक घरात नळ’ असावा असे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
टक्केवारीचे आरोप खरे
आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांवर लावलेले टक्केवारीचे आरोप खरे आहेत. मात्र याबाबत विविध पक्षांच्या आमदारांमध्ये बोलण्याची हिम्मत नाही. हा मुद्दा फक्त अपक्ष आमदारच बाहेर काढू शकतात असेही यावेळी राणा म्हणाल्या.
न्यायालयीन चौकशीसाठी तयार
अमरावती येथे पाण्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे त्याचा आढावा घेत असल्यामुळे आज न्यायालयात जाऊ शकले नाही. मात्र न्यायालय जेव्हाही मला चौकशीसाठी बोलवणार तेव्हा मी जाण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.