26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रअनन्या पांडेची चौकशी

अनन्या पांडेची चौकशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : आर्यन खान आणि मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनंतर आता अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या निशाण्यावर आहे. अनन्या पांडेच्या घरी आज सकाळी एनसीबीने छापा टाकून तपासणी केल्यानंतर तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. संध्याकाळी ४ वाजता एनसीबीच्या कार्यालयात गेलेली अनन्या ६ वाजता बाहेर पडली. त्यामुळे दोन तास चौकशी झाल्यानंतरदेखील अनन्याला उद्या पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता अनन्याला एनसीबीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतला पोहोचले. अहवालानुसार पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तूदेखील घेतल्या आहेत. संशयित आणि साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावले जाते. एखाद्याला चौकशीसाठी बोलावणे याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे, अशी प्रतिक्रिया एनसीबीच्या अधिका-यांनी दिल्यामुळे नेमकी अनन्याची चौकशी कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

२२ वर्षीय अनन्याने २०१९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनन्या स्टार सर्कलमध्ये वावरू लागली आहे. २ ऑक्टोबरला कार्टेलिया क्रूजवर टाकलेल्या छाप्यामध्ये एनसीबीने अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये अनन्या पांडेचे नाव समोर आले आहे. त्या संदर्भात तिची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.

अनेक स्टारकिडस् निशाण्यावर
आर्यन खानच्या अटकेनंतर त्याच्या संपर्कात आलेले अनेक स्टार किडस् एनसीबीच्या रडारवर आले आहेत. आज अभिनेता चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले होते. याशिवाय एका मोठ्या निर्मात्याची मुलगी, एका अभिनेत्याचा भाचा, एका अभिनेत्याची मुलगी आणि एका अभिनेत्रीची बहीणही एनसीबीच्या रडारवर आहे. आर्यनसोबत त्यांच्या चॅटही आढळल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या