19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात थेट ‘सामना’ होणार असून, ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात असल्याने त्यांना कोणते चिन्ह मिळणार, हा प्रश्न आहे.

पुण्यात काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार सोहळ््याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत करणार, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अंधेरी (पूर्व) च्या विधानसभा जागेवर एकनाथ शिंदे गट दावा करण्याच्या तयारीत असून, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर शिंदे गट दावा करीत आहे. शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६,९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुस-या स्थानी होते.

लटके यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यामुळे शिवसेनेची ही जागा शिंदे गटाला मिळायला हवी, असे काही नेत्यांना वाटत आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक लढवू नये, असाही एक मतप्रवाह शिंदे गटामध्ये आहे. मात्र, भाजपाने काही काळापासून ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये हा सामना रंगणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या