मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. आज सकाळी ६.३० च्या सुमारास ईडीने ही छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल परबांशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीने धाड टाकली आहे. अनिल परबांविरोधात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेच्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आता अनिल परब यांच्यावर देखील ईडीने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने परबांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्स देखील बजावू शकते.
आम्ही अनिल परबांच्या पाठिशी : राऊत
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. केंद्रातील भाजप सरकारने कितीही सूडाने कारवाई केली तरी आम्ही डगमगणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनिल परब आमचे सहकारी आहेत. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. अनिल परब आणि आमच्या अन्य सहका-यांवर जे आरोप लावले जात आहेत, त्यापेक्षा गंभीर गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. अशा कारवायांमुळे सरकार पडणार नाही, तसेच सर्व निवडणुकाही सुरळीत पार पडतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.