नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि़ १० नोव्हेंबर रोजी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्टातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्या असून, १ डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यापैकी नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे.
कधीकाळी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे़ या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर या ठिकाणी भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
काँग्रेसकडून प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला दोन वेळा टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही.
त्यामुळे आता तरुण दमाचे अभिजित वंजारी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वंजारी आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पुणे शिक्षक मतदार संघात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून, येथे १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
‘आप’ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही