नाशिक : मागील आठवड्यात १३ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुन्हा दहा माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाला दिवसेंदिवस खिंडार पडताना दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरे गटातून काही माजी आमदार, माजी जिल्हाप्रमुख यांच्यासह पदाधिका-यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला वारंवार धक्के बसताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या १२ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत हे नाशिक दौ-यावर येऊन गेले होते.
गेल्या आठवड्यात नाशिकमधील ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र तत्पूर्वीच भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर आज पुन्हा ठाकरे गटातील काही माजी आमदार, माजी जिल्हाप्रमुखांसह तालुकाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षप्रवेश करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे.