मुंबई : शिवसेनेच्या ४० पेक्षाही अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. तब्बल ४० आमदार भाजपसोबत गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. सोमवार, दि. ११ जुलै रोजी मातोश्रीवर सुरू झालेल्या बैठकीला तब्बल ७ खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेत बंडाळीचा दुसरा अध्याय सुरू होणार का? या चर्चेला उधाण आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर खासदारांची ‘मन की बात’ जाणून घेण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. मात्र या बैठकीला लोकसभेच्या ७ खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या ११ खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, आणि मुर्मू यांना मतदान करावयाचे झाल्यास काय भूमिका घ्यावी लागेल याविषयी सल्ला मसलत केली. यावेळी सभापतींकडे १४ जुलैच्या आसपास स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी करता येऊ शकते. त्यानंतर शिवसेना खासदारांच्या गटाला मतदान करता येऊ शकते, या अनुषंगाने तब्बल साडे पाच तास खलबते झाली. शिवसेना खासदारांनीच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याची आग्रही मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही केली आहे. उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा शिवसेनेत खासदारांच्या बंडाचा दुसरा अध्याय सुरू होणार असे संकेत मिळत आहेत.
शिवसेनेचे उपस्थित खासदार
गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राउत,
धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रताप जाधव, सदशिव लोखंडे, संजय राउत, प्रियंका चतुर्वेदी,
गैरहजर खासदार
भावना गवळी, राजेंद्र गावित, हेमंत जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, ओमराजे निंबाळकर, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, राजन विचारे, कलाबेन डेलकर
शिवसेनेची ‘क्लीन अप’ मोहीम
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी बंडखोरांनजीकच्या पदाधिका-यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्याची सुरुवात माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भायखळ्यातून करण्यात आली आहे. मुंबईत पक्षाची नव्याने बांधणी सुरू असून शिवसेनेकडून पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.
शरद पवार हवेत, की शिवसैनिक?
शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरे यांना ‘शरद पवार हवेत, की शिवसैनिक याचा निर्णय घ्यावा’ असे स्पष्टच सांगितले. तसेच भविष्यात एकनाथ शिंदे आणि भाजपशी जुळवून घ्यावे लागेल, अशी रोखठोक भूमिका मांडली. शिवसेना खासदारांनी रोखठोक शब्दात ‘मन की बात’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. एकूणच बैठकीतील वातावरण पाहून संजय राऊत यांनी काढता पाय घेतला. यशवंत सिन्हांना मतदान करण्याची भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती मात्र खासदारांचा कडाडून विरोध व्यक्त झाला. अखेर दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सदा सरवणकरांचा विभागप्रमुख पदाचा राजीनामा
शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या दादरमध्येही संघटनात्मक पातळीवरही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे लोण हळूहळू ग्रामीण भागातही पसरत चालले असून शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे धनुष्यबाण हे पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्हंही गमवावे लागते की काय, अशी भीती शिवसेनेला वाटते आहे. त्यामुळे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती करणारे कॅव्हेट दाखल केले आहे.