मुंबई, दि.२ (प्रतिनिधी) जगातील काही देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करावे लागले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे आज सांगितले. याउपरही कोरोनाची दुसरी आली तरी राज्य सरकार पूर्ण तयारीत असल्याची माहिती टोपे यांनी दिली. लॉकडाऊनपासून बंद असलेल्या मंदिरांचे दरवाजे उघडण्यासाठी दबाव वाढत असला तरी दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अनलॉकनंतर जनजीवन सुरळीत झाल्यानंतर युरोपमधील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागले आहे. त्यामुळे भारतातही कोरोनाची दुसरी लाट येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मंदिरांचे दरवाजे दिवाळीपर्यंत बंदच !
मंदिरं उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांशी चर्चा करून घेतील अशी माहितीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली. सध्या लग्नसमारंभात केवळ पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. हे निर्बंध शिथिल करून संख्येत वाढ करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचेही टोपे यांनी सांगितले.