पुणे: जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला दिल्लीला पोहोचले. यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी अर्जुन खोतकरांना सल्ला दिला आहे.
खोतकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर कोणतेही राजकीय भाष्य करणे नीलम गो-हेंनी टाळलं आहे. मात्र, महाभारतातील उदाहरण देत ‘‘अर्जुनाने कृष्णरूपी ठाकरेंकडे जावे’’, असा सल्ला नीलम गो-हेंनी खोतकरांना दिला आहे.
‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरू केली. त्यामुळे खोतकरांनी एकनाथ शिंदेंचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला असल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ईडीच्या कारवाईमुळे अडचणीत आलेले खोतकर शिंदे गटात सामील होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.