24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे पुण्यातून निघताच कार्यकर्त्यांमध्ये राडा

राज ठाकरे पुण्यातून निघताच कार्यकर्त्यांमध्ये राडा

एकमत ऑनलाईन

पुणे : राज ठाकरेंनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौ-यापूर्वी पुण्यात सभा घेऊन ते रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात होते. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले. कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरू केली होती. यानंतर राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मात्र अचानक त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात राडा झाला. काल रात्री उशिरा कार्यालयात गोंधळाला सुरुवात झाली. आणि त्याचे पर्यवसान हमरीतुमरीत झाले. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर आणि शिरोळे यांच्यात वादाला सुरुवात झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष आहेत. मात्र पक्षाच्या कोणत्याही बैठकांना का बोलावले जात नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे संतापले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. यातून कार्यकर्तेही तापले आणि राड्याला सुरुवात झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व पदाधिका-यांसमोरच वाद झाला.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मागील अनेक दिवसांपासून पुण्यात मनसेच्या गोटात काही नेत्यांची नाराजी आहे. याआधी वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याची परिस्थिती होती. त्यांना तत्काळ शहराध्यक्षपदावरून बाजूलाही करण्यात आले. अद्याप मनसेत अंतर्गत खदखद सुरू आहे. यासाठी नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने सभादेखील रद्द झाली. पण राज ठाकरे मुंबईला पोहोचण्याआधीच मनसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या