21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रआशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ, १ जुलैपासून अंमलबजावणी

आशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ, १ जुलैपासून अंमलबजावणी

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२३ (प्रतिनिधी) मानधनात वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेलेल्या आशा स्वयंसेविकांच्या मागण्या अखेर सरकारने मान्य केल्या आहेत. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. याशिवाय आशा स्वयंसेविकांना विशेष भेट म्हणून एक स्मार्ट फोनही देण्यात येणार आहे. मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात येत असून उद्यापासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असे कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सुमारे ७० हजार आशा सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून संप पुकारला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे अनेक बैठका होऊनही संघटनेने ठाम भूमिका घेतल्याने मार्ग निघत नव्हता. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आशा सेविकांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य करण्याचा प्रस्ताव सरकारने दिला होता. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी, सहआयुक्त डॉ.सतीश पवार, कृती समितीचे शुभा शमीम, राजू देसले, शंकर पुजारी, आशा सेविकांच्या प्रतिनिधी सुमन कांबळे आदी उपस्थित होते.

अखेर आशा सेविकांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता अशी १५०० रुपयांची वाढ करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि संपाची कोंडी फुटली. गट प्रवर्तकांना १२०० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे एकूण १७०० रुपयांची वाढ मिळणार असून त्यासाठी राज्य शासन प्रतिवर्ष २०२ कोटी रुपये खर्च करणार आहे. ‘आशां’ ताईंना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.

राज्यातील ६८ हजार २९७ आशा सेविका आणि ३ हजार ५७० गट प्रवर्तकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. पुढच्या वर्षी जुलैमध्ये आशा सेविकांना आणखी ५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून आशा सेविकांचे काम व त्यांना मिळणारे मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचा प्रतिनिधी असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आशांना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. आर्थिक परिस्थितीनुसार हा भत्ता देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना शिफारस केली जाईल, असे सांगतानाच कोरोनावरील लसीकरणासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्याकरिता आशांना २०० रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाईल.

त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात आशांकरिता ‘निवारा केंद्र’ उपलब्ध करुन देण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आशा सेविकांनी केलेले काम उल्लेखनिय असून त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने नेहमीच कौतुक केले आहे. गेल्या वर्षी राज्य शासनाने आशा आणि गटप्रवर्तकांना २ हजार रुपयांची वाढ केली आहे. राज्यात संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशांनी ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. कृती समितीच्या वतीने पाटील, डॉ.डी.एल. कराड यांनी आरोग्यमंत्री आणि शासनाचे आभार मानत संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या