आषाढी वारी : मानाच्या सातपैकी चार पालख्यांचा पायी दिंडी सोहळा रद्द

360

औरंगाबाद : वृत्तसंस्था
कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय मानाच्या पालखी आयोजकांनी घेतला आहे. आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, प्रस्थानाच्या दिवशी शासनाच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. पैठणमध्ये नाथच्या जुन्यावाड्यातून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल. दशमीपर्यंत तिथेच मुक्कामी राहील. दशमीला ३० मानक-यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी. हा सगळा प्रवास मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी करण्यात येईल.

Read More  ३० मे नंतर आषाढी वारीचा निर्णय

असे असले तरी या सर्व मानक-यांनी शासनाकडे विनंती केली आहे की कमीत कमी पाच लोकांची परवानगी पायी सोहळ्यासाठी देण्यात यावी, तशी परवानगी मिळाली तर वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित होणार नाही. सोहळा पाच लोकांसह पूर्ण करण्यात येईल. मात्र परवानगी मिळाली नाही तर दशमीला पंढरपूरला जाण्याची तरी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या सर्व मानर्क­यांनी शासनाला केली आहे.

आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी आळंदी आणि देहु देवस्थानच्या विश्वस्तांची १५ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मोजक्या लोकांसह आळंदी आणि देहु मधून मोजक्या लोकांसह पायी पालखी सोहळा पार पाडला जावा. मात्र, त्याची रुपरेषा प्रशासनाकडून ठरवली जावी, असा सुर या बैठकीत उमटला होता. राज्यातील हा सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाला कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु, वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. या बैठकीत ३० मे नंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असा निर्णय झाला आहे.

Read More  पालखी सोहळा होणार, शासनाने पद्धत सुचवावी

या यात्रेला सात संतांच्या प्रमुख मानाचे पालखी सोहळे हजारो भविकांसह पायी पंढरपूरला येत असतात. याशिवाय इतर १५० पालखी सोहळे राज्य आणि शेजारच्या राज्यातून पायी चालत येत असतात. सर्वात मोठे असलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या रेड झोनमधून येतात तर निवृत्तीनाथांची पालखी त्रंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महाराजांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून म्हणजेच रेड झोनमधून येते. दुसरीकडे सोलापूर जिल्हाही रेड झोनमध्ये असून अशावेळी आषाढी यात्रेला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरसच्या फैलावाची भीती पंढरपूरकर नागरिक आणि प्रशासनाला भेडसावत आहे.