27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्ष निवडणूक, सेनेचे साळवी मैदानात

विधानसभा अध्यक्ष निवडणूक, सेनेचे साळवी मैदानात

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या दि. ३ जुलै रोजी होणारी ही निवडणूकही चुरशीची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना व्हीप जारी केला. त्यावर आमच्याकडे बहुमत असल्याने आम्हाला व्हीप लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावरून उद्या दोन्ही गट विधानसभेत भिडण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली, तर महाविकास आघाडीनेही त्यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरविला असून, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नार्वेकर विरुद्ध साळवी यांच्यात अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व शिवसेना आमदारांसाठी व्हीप जारी केला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे याद्वारे आदेश दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंड केल्याने हे आमदार आता सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. यावरून उद्या सभागृहात शिंदे गट आणि शिवसेनेचे आमदार आमने-सामने पाहायला मिळणार आहेत. कारण बंडखोर आमदार आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत, असे सांगत आहेत. खरे तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. मात्र, हा गटनेतेपदाचा वादही कोर्टात जाऊ शकतो.

विधानसभेत संघर्ष टोकाला?
सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असला, तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा व्हीप आम्हाला बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान सभेत ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदारांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला व्हीप लागू होत नाही
शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहोत. आमच्याकडे बहुमत असल्याने विजय आमचाच होईल, असेही ते म्हणाले. ते गोवा विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

शिंदेंच्या हकालपट्टीला कायदेशीर आव्हान
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर शिंदेंनी आपल्या हकालपट्टीला कायदेशीर आव्हान देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. पक्षाविरोधात बंड करून भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना शपथविधीच्या दुस-याच दिवशी पक्षाने दणका दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या