औरंगाबाद : शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या हल्ल्याला समर्थन नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी बंडखोरांना इशाराही दिला आहे.
हल्ल्याचे समर्थन मी करणार नाही. पण हल्ला का होतो? जो उठतो तो फुटीर आमदार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर बोलायला लागलाय,अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. पुढे खैरे यांनी, ‘‘एक तर तुम्ही फुटले त्यात तुम्ही पक्षाच्या नेत्यांबद्दल असं उलटं बोलता. शिवसैनिक सहन करणार नाही,’’ असेही म्हटले.
आमच्या डोक्यात अक्कल असते आणि गुडघ्यात अक्कल असते असे खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना हातवारे करून सांगितले. ‘‘आम्ही काहीही करू शकतो,’’ असे खैरे म्हणाले.
तानाजी सावंतांवर टीका
आदित्य ठाकरे फक्त एक आमदार आहेत असे म्हणणारे पुण्यातील बंडखोर नेते तानाजी सावंत यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. तानाजी म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही. मागे मागे फिरायचा तो आदित्य ठाकरेंच्या. आता ओळखत नाही असे म्हणतो. ही कोणती पद्धत आहे, असे तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करताना खैरे म्हणाले.