मुंबई : गौतमी पाटील हिच्या अश्लील डान्सला आवर घाला नाहीतर गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.
दरम्यान आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलने डान्स करून प्रेक्षकांना वेडे करणारी लावणी कलाकार आणि इन्स्टास्टार गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार डान्सचे रिल्स दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी अश्लील हावभाव केल्याने तिच्यावर जोरदार टीका होत होती. त्यातच सांगलीच्या बेडगमध्ये तिच्या लावणी कार्यक्रमात झालेल्या प्रकारामुळे तिच्यावर सर्वच स्तरांतून जोरदार टीका झाली. काही लावणी कलाकारांनीही तिला इशारा दिला होता. आता त्यातच मनसेनेही तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान जालन्यातील सेवली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकामार्फत पोलिस महासंचालकांकडे मनसेने ही तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पत्र दिले आहे, ज्यात लिहिलेय, गौतमी पाटील ही हेतुपुरस्पर अश्लील हावभाव करत डान्स करते. याचे व्हीडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून व अश्लीलरीत्या अंगप्रदर्शन करून हावभाव करत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतेचे वातावरण निर्माण होत आहे. याचे वाईट परिणाम राज्यातील तरुणांवर होत आहेत. म्हणून गौतमी पाटील हिच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली आहे.