21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण-मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण-मुख्यमंत्र्यांची घोषणा

एकमत ऑनलाईन

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ऑनलाईन संवाद

औरंगाबाद :  मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. विकासाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल सुरू आहे. यात काही अडचणीही आहेत. मात्र, येणा-या काळात या अडचणी सोडविल्या जातील, असे सांगतानाच त्यांनी मराठवाडा भविष्यात दुष्काळग्रस्त होऊ नये याची खबरदारी, जबाबदारी आम्ही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील जनतेला ऑनलाईन पध्दतीने शुभेच्छा देताना ते बोलत होते. मराठवाडा कोरोनामुक्त करण्याची शपथ घ्या, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा सिध्दार्थ उद्यानात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते. मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती अन्यायाविरुद्ध लढणा-यांचीदेखील भूमी आहे. अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवणे हे मराठवाड्याचे वैशिष्ट्य आहे. मुक्तिसंग्रामसाठी अबालवृध्दांनी योगदान दिले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक जण या मुक्ती लढ्यात सहभागी झाले. त्या सर्वांना मी वंदन करतो, असा उल्लेख त्यांनी केला.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ द्यायचा नाही, मुक्ती लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीला सांगायचा आहे आणि त्यासाठी सिध्दार्थ उद्यानाच्या परिसरात मुक्तिसंग्राम संग्रहालय उभारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपले मराठवाड्याशी, औरंगाबादशी वेगळे नाते आहे. भावनात्मक नात्याची आपली जवळीक आहे असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करून केला आणि येणा-या काळात त्या मार्गी लावून विकासाला गती देऊ , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. देसाई यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबादेत प्राधिकरण
मराठवाडा भविष्यात दुष्काळग्रस्त होऊ नये, याची खबरदारी, जबाबदारी आम्ही घेतली आहे. समृध्दी महामार्ग झाल्यावर मराठवाडा समृध्द होईल, असा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल. या प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे.

मराठवाडा कोरोनामुक्त करण्याची शपथ घ्या
ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात मराठवाड्यातील आबालवृद्ध एकवटून त्यांनी रझाकारी अत्याचार मोडून टाकला. तसेच आता आपले कोरोना विषाणू बरोबर दुसरे युद्ध आहे, त्याच्याबरोबर आपल्याला लढायचे आहे. सर्वांनी या लढाईत उतरावे आणि मराठवाडा कोरोनामुक्त करण्याची शपथ घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या