पुणे, दि. 5:- पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.
पुण्यातील विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.
बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिद्धार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णी, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ कुणाल खेमनार, पोलीस अधिक्षक संदीप पाटील आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व खासदार शरद पवार यांनी शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधींच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी केंद्रीय मंत्री श्री जावडेकर म्हणाले, नागरिकांमध्ये ‘कोरोना’ विषाणूची भीती कमी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करावी. कोरोनाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचनाही केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री जावडेकर यांनी दिल्या.
आकडेवाले जोमात, मिटरवाले कोमात