मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही, आज त्यांचाच विचार ऐकून आम्ही काम करतोय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब रिमोट कंट्रोल चालवायचे, पण ते दुस-यासाठी, स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधीही रिमोट कंट्रोल चालवला नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये आज बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचं पालन व्हायचं. ठाणं आणि शिवसेना हे नातंच वेगळं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वयाच्या १६ व्या वर्षापासून मी बाळासाहेबांसोबत काम केलं, त्यांची भाषणं ऐकली. आज त्यांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. आज मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्यात येतंय हा दुर्मिळ क्षण आहे. एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचे काम केले. कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केले. एखाद्या शेतक-याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे.