28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे कलम त्यात टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय, ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. एकीकडे ओबीसींच्या प्रश्नावर फडणवीस आक्रमक झाले असता दुस-या बाजूने भाजपने बोलावलेल्या ओबीसी मोर्चा समितीच्या बैठकीला पक्षातील ओबीसी नेते पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पाठ फिरवल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने ओबीसी आरक्षणाचे हत्यार उपसले आहे. आज मुंबईतील भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात ओबीसी मोर्चा समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ओबीसी संघटनेचे नेते आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, योगेश टिळेकर आदी नेते उपस्थित होते. परंतु, या बैठकीला ओबीसी नेत्यांनीच पाठ फिरवली.

ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची ओबीसी मोर्चाला अनुपस्थिती होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नुकतेच ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजपने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन ओबीसी नेत्याचे नेतृत्व पुन्हा एकदा उभारण्याचा प्रयत्न केला आहे.

याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप मध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर इतर सगळ्या मोर्चांची बैठक होते. सगळ्यांनीच याला यावे असे काही नाही. योगायोगाने मी आणि देवेंद्र फडणवीस आलो. ते आमचे नेते आहेतच पण त्याचे सगळे नेते मोर्चांच्या बैठकीला येतीलच असे काही नाही. आमची पार्टी नवीन रक्ताला वाव देणारी आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का आम्ही लावू देणार नाही. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओबीसी समाजाबद्दलची भूमिका काय ते सांगा, आमची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही , असा थेट सवालही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

फडणविसांचे आरोप
ओबीसी समाजाच्या हितासाठी भाजप सरकारनेच हिताचे निर्णय घेतले, ओबीसी महामंडळ असेल किंवा महाज्योती संस्थेची स्थापना असेल, हे निर्णय घेण्यात आले. ओबीसी विकास महामंडळाला एक नवा पैसाही दिला जात नव्हता. त्यावेळी, आपण ५०० कोटी रुपयांचा निधी महामंडळासाठी दिला. आज, ओबीसी महामंडळाच्या खात्यात २०० कोटी रुपये आहेत. पण, राज्य सरकारने या महामंडळातील सगळ्या योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे, ओबीसी महामंडळाची स्थिती ही महाआघाडी सरकारच्या काळात होती, तशीच बनल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

महावितरणच्या अभियंत्याने घेतला गळफास

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या