मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. केरळ व महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास कोरोना पुन्हा येईल, असा इशारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.
तसेच प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेतल्यास कोरोनाचा पराभव निश्चित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात कोरोना संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाºया ४० कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाऊंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या. याप्रसंगी कोश्यारी यांनी हा इशारा दिला.
कोरोना संकटात समाज एकवटला
राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले तेव्हा राज्यातील सर्व लोकांनी परस्पर सहकार्याने काम केले. एक दुसºयाला मदत केली. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलेच परंतु या काळात विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केले, असे कोश्यारी यांनी आवर्जून सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात लोकांनी पोलिसांवर पुष्पवर्षाव केला ही अनोखी घटना या काळात पाहायला मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.
…तर कोरोनाचा पराभव निश्चित
ईश्वर केवळ मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळांपुरता मर्यादित नसून तो जनाजनात वास करीत आहे, हे जाणून लोकांनी या काळात भगवान बुद्ध व महात्मा गांधींचा करुणा भाव जागविला. लोकांमधील सेवा, समर्पण व करुणा भाव टिकून राहिला तर कोरोनासारखी कितीही संकटे आली तरीही त्यांचा निश्चित पराभव होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कोरोना काळात जिवावर उदार होऊन सेवा करणाºया विविध योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगावच्या लग्नात कोरोनाचा धुमाकूळ…