21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रठाकरे यांच्या स्मारकाचा मुंबईत भूमिपूजन सोहळा

ठाकरे यांच्या स्मारकाचा मुंबईत भूमिपूजन सोहळा

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईच्या राजकीय वर्तुळात बुधवारी सकाळपासूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ््याची चर्चा होती. सरकारकडून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. मात्र, सरकारकडून मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीतच सोहळा आयोजित केल्याचे सांगितले जात होते. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर संध्याकाळी ५.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ््यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केले गेले. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि सरतेशेवटी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्तेदेखील वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग होता.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रित केलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झालं नाही. त्यामुळे भाजपाच्या नेतेमंडळींकडून त्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली गेली. मनसे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांनादेखील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधत सरकार पडण्याची भीती होती, म्हणून इतक्या घाईत भूमिपूजन सोहळा करून घेतला, अशी खोचक टीका केली आहे.

प्रतिकृतीचे केले होते अनावरण
कुलाबा येथे काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले होते. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, रिपाइं असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी फक्त महाविकास आघाडी सरकारमधल्याच पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिल्यावरून टीका केली जात होती.

जुन्या महापौर निवासस्थान वास्तूत उभारणार स्मारक
मुंबईतील जुन्या महापौर निवासस्थानाची वास्तू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी अंतिम करण्यात आली असून तिथे बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

१०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? हायकोर्टाचा सवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या