18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे यांना मोठा धक्का

एकनाथ खडसे यांना मोठा धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकेकाळी भाजपाचे फायरब्रँड नेते असलेले मात्र नंतर पक्षांतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात आज मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ््याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. पण या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्­र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या