मुंबई : राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपापलं बघा, असा निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा सहावा उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार उभा केला होता. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडे मते असताना शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला; तर भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या गोटात कमालीचा उत्साह दिसून येत आहे. त्यांच्याकडे जास्तीची मते नसताना महाविकास आघाडीतील आमदारांनी मदत केल्याने शिवसेना नाराज आहे. ही नाराजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलूनही दाखवली.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हवी तशी मदत केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करुन शिवसेनेच्या दुस-या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एकरुप ठरणारी भूमिका घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दूस-या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. यामुळेच शिवसेना आता महाविकास आघाडीतील इतर पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाही अशी माहिती समोर आली आहे.
अपक्षांवरील आरोप शिवसेनेला महागात?
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र भुयार यांनी म्हटले, शिवसेनेचे नियोजन चुकलेले आहे. मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केले आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत. प्रामाणिकपणे मतदान करुन सुद्धा अशा प्रकारे आमच्याबाबत विधान केले जात असतील तर हे चुकीचे आहे. आम्हालाही लोकांनी निवडून दिले आहे आणि अशावेळी आमच्याविषयी गैरसमज निर्माण करणे चुकीचे आहे.