24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपकडून महाराष्ट्रातील चार नेत्यांवर मोठी जबाबदारी; तावडेंचे प्रमोशन तर मुंडेंकडे पुन्हा तेच...

भाजपकडून महाराष्ट्रातील चार नेत्यांवर मोठी जबाबदारी; तावडेंचे प्रमोशन तर मुंडेंकडे पुन्हा तेच पद

एकमत ऑनलाईन

मुंबई : : लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता भाजपाने केंद्रीय पातळीवर काही राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशात सहप्रभारीपदाची आहे तीच जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्रक भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही यात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी
महाराष्ट्रात डावलण्यात आलेल्या विनोद तावडे यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे निवडीवरून दिसत आहे. बिहारमध्ये नुकतेच नितीश कुमार यांनी भाजपापासून फारकत घेत राजदसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत बिहारमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. अशा स्थितीत विनोद तावडे यांना हरियाणानंतर आता बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदही देण्यात आलेले आहे. बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी दिल्याने तावडे यांचे वजन पक्षात वाढत असल्याचे दिसत आहे.

पंकजा मुंडेंकडे पुन्हा तेच पद
राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र, पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसतो आहे. २०२० साली भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशाची सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांच्यासोबत डॉ. राम शंकर कठेरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंकजा यांच्याकडे गेल्या वेळी दिलेलीच जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे.

प्रकाश जावडेकर यांच्यावरही मोठी जबाबदारी
तर डाव्यांचा गड मानल्या जाणा-या केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी ही माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदावरून बाजूला केल्यापासून प्रकाश जावडेकर हे फारसे सक्रिय नव्हते. मात्र, आता भाजपने त्यांना आणखी एक संधी देऊ केली आहे. केरळमध्ये डाव्यांचा विरोध मोडून त्याठिकाणी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचा शिरकाव करण्यासाठी जावडेकरांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

विजया रहाटकर यांनाही जबाबदारी
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडे भाजपने राजस्थानच्या सहप्रभारीपदाची धुरा दिली आहे. सध्याच्या घडीला भाजपच्या ताब्यात नसणा-या मोजक्या राज्यांपैकी एक म्हणून राजस्थानची ओळख आहे. याठिकाणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन लोटस’च्या प्रयत्नानंतरही मोठ्या कौशल्याने काँग्रेसची सत्ता राखली आहे. त्यामुळे विजया रहाटकर याठिकाणी काही चमत्कार करून दाखवतात का, हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या