मुंबई : महाराष्ट्रामध्ये बाजूच्या राज्यांइतका बर्ड फ्लूचा प्रभाव सध्या दिसत नसला तरी तुरळक जिल्ह्यांमध्ये घडणाºया घटनांमुळे मुंबईकर मांसाहारापेक्षा पुन्हा एकदा शाकाहाराला पसंती देऊ लागल्याचे दिसत आहे. अंडी पूर्ण उकडून खा, मांस चांगले शिजवून खा, या सूचनांनंतरही अनेक घरांमध्ये शाकाहारी थाळी शिजू लागली आहे.
बर्ड फ्लूच्या भीतीने गेल्या आठवड्यापासून ग्राहक संख्येमध्ये ३० ते ३५ टक्के घट झाल्याचे कुर्ला खाटिक असोसिएशनचे गणेश नाखवा यांनी सांगितले. पूर्वी १६० रुपये किलो दराने विकले जाणारे चिकन आता ८० ते ९० रुपये किलोने विकले जात आहे. मात्र ग्राहक नाही, असे दुहेरी संकट आहे. हा रोग नियंत्रणात न आल्यास अडचणी आणखी वाढतील, असे ते म्हणाले.
अंड्यांचा दर नगामागे दोन ते तीन रुपयांनी कमी झाला आहे. नित्यनेमाने अंडी घेणारे ग्राहकही पाठ फिरवत आहेत. त्याऐवजी थंडीच्या काळात येणाºया भाज्या, फळांवर भर दिला जात आहे. महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी म्हणाले, ‘आत्तापर्यंत राज्यात बर्ड फ्लूचा परिणाम नसल्याने चिकन आणि अंड्याच्या मागणीत खूप घट झाली नव्हती. मात्र, आता काही जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम दिसून येत असल्याने मागणी थोडी कमी होऊ शकेल.’
संसर्गाची शक्यता कमी
अन्नपदार्थ शिजवण्याची भारतीय परंपरा लक्षात घेता हा विषाणू ७० अंशांपलीकडे तग धरू शकत नाही. तसेच प्राण्यांपासून किंवा अंड्यातून माणसाला याचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यामुळे घाबरूनही जाऊ नये, असेही आवाहन व्यावसायिकांकडून होत आहे.
कुरुंदा येथे दिवसाढवळ्या दोन लाखांची चोरी