मुंबई : पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ असून मी ‘सामना’ वाचत नाही आणि ‘सामना’ची दखल देखील मी घेत नाही, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. विधान परिषद निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंना डावलण्यात आले असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला होता. पुढे ते म्हणाले की, भाजपा हे पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत.
पंकजा मुंडे या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. बाकी कोणी त्यांची काळजी करण्याची गरज नाही.
सुप्रिया सुळे यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, नाचता येईना अंगण वाकडे, त्यांना पराभव आधी दिसला होता. त्यामुळे त्याची स्क्रिप्ट आधीच करण्यात आली होती. त्यानंतर सगळे त्या स्क्रिप्टनुसार बोलतात. त्यांचं चांगलं आहे की आपापसांत भांडणं जरी असली तरी दिवसभर सगळे एकच वाक्य बोलत असतात.
पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले : राऊत
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वत:ची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिका-यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवा-या सहज मिळाल्या.
सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली. तसेच, गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे जवळचे संबंध होते. त्यामुळे पंकजा मुंडेंची आम्हाला चिंता वाटते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.