26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते!

शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय अस्थिरतेचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश््यारी यांनी गुरुवारी, ३० जूनला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावत ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विधानसभेत गुरुवारी फ्लोअर टेस्ट होणार आहे.
आज सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरूवात होईल. सायंकाळी ५ पूर्वी चाचणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सभागृहात उद्धव ठाकरे बहुमत सिद्ध करू शकतील का? हे पाहणे गरजेचे आहे.

राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मला देण्यात आली आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. शिवसेनेचे ३९ आमदार महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले.त्यात ७ अपक्ष आमदारांनी पत्र पाठवून उद्धव ठाकरे सरकारचे समर्थन परत घेतल्याचे राजभवनाला कळवले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत चाचणी घ्यावी लागत आहे.

सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी नंबरगेम महत्त्वाचा ठरतो. शिवसेनेकडे सध्या ५५ आमदार आहेत. त्यापैकी ३९ आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेत. हे बंडखोर आमदार मागील ९ दिवसांपासून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारमधील २ आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर २ सदस्य कारागृहात आहेत. म्हणजे एकूण ४३ आमदारांचे गणित महाविकास आघाडी सरकारची समिकरणे बिघडवू शकते. तर महाविकास आघाडी समर्थक प्रहारचे २ इतर ७ अपक्ष आमदारांनी मविआ सरकारपासून अंतर ठेवले आहे.

दुसरीकडे शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. त्याबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय प्रलंबित आहे. शिंदे गट हा तांत्रिक मुद्दा असल्याचे सांगत असले तरी बंडखोर आमदारांचा मार्ग सोपा नाही. शिवसेनेचे ३९ आमदार शिंदे गटाकडे आहेत. अशावेळी दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे पक्षांतरबंदीचा कायदा त्यांना लागू होत नाही. हे आमदार भाजपासोबत युती करा, अशी आग्रही मागणी करत आहेत. त्यामुळे भाजपासाठी सत्तास्थापनेचा मार्ग सुकर आहे. आता प्रश्न असा आहे की, गुवाहाटीत जे आमदार तळ ठोकून होते, ते शिंदे यांच्यासोबतच आहेत का? त्यातील काही उद्धव ठाकरे गटात सहभागी होऊ शकतात. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडील नेते सातत्याने बंडखोर आमदारांपैकी काहीजण संपर्कात असल्याचा दावा करत आहेत.

काय आहे बलाबल?
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. त्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २८७ इतकी आहे. अशावेळी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे ५३, काँग्रेसकडे ४४ आणि शिवसेनेकडे ५५ आमदार आहेत. या तिन्ही पक्षांची बेरीज १५२ इतकी आहे. त्याशिवाय मविआमधील घटक पक्षही समाविष्ट आहेत. परंतु शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे हे गणित बिघडले.

मविआ सरकारकडे बहुजन विकास आघाडीचे ३, सपा, २ आणि इतर ११ आमदारांचे समर्थन आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडे १०६ आमदार आहेत. ७ अपक्ष आणि अन्य आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. सध्याच्या घडीला भाजपाकडे ११३ आमदारांचे पाठबळ आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना अपात्र ठरवले किंवा त्यांना मतदानापासून वंचित ठेवले तरी बहुमत आकडा भाजपाला सहज गाठता येईल. २८७ आमदारांसाठी १४४ आमदारांचे पाठबळ हवे. परंतु शिंदे गटाचे ३९ आमदार बहुमत चाचणीत सहभागी झाले नाहीत तर बहुमतासाठी १२१ आमदारांची गरज लागेल. अशावेळी भाजपाकडे ११३ आणि इतर १६ आमदारांचे पाठबळ आहे. हा आकडा १२९ पर्यंत पोहचतो. त्यामुळे उद्धव ठाकरे बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी ठरतील, असे दिसते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या