अहमदनगर : अजितदादांनी सभेत राज्यपालांचे कान टोचले असते म्हणूनच भाजपकडून जाणीवपूर्वक त्यांना बोलण्याची संधी दिली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यात आता रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे.
रोहित पवार यांनी यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही उत्तर दिले. चांगल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीने मिठाचा खडा टाकल्याची टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्यावर रोहित पवार म्हणाले की, भाजपनेच धार्मिक कार्यक्रमात मिठाचा खडा टाकला आहे.
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. देहूतला मंदिर शिळा लोकार्पण सोहळा मंगळवारी (१४ जून) पंतप्रधानांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.