नाशिक : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये भाजप पदाधिका-यांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत, ढोल ताशांच्या गजरात नाचत नव्या सरकारचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
राज्यातील दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सत्ता स्थापनेचा दावा केला आणि काल राज्यपालांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.