मुंबई : माण-खटाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज आज (मंगळवार, दि. १४ ) फेटाळला. येत्या दोन आठवड्यांत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदतही दिली आहे, त्यामुळे आता जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने आमदार गोरे यांना तात्पुरते अटकेपासून संरक्षण दिले होते. तोपर्यंत आमदार गोरेंना अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सातारा पोलिसांना दिले होते. ९ जून रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. आज सकाळी या अर्जावर सुनावणीचा आदेश देण्यात आला असून जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
काय आहे प्रकरण
मायणी गावातील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार दिली आहे.