कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना सुरू आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच ही पोटनिवडणूक जिंकत राज्यातील भाजपचा १०७ वा आमदार निवडून येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
‘कोल्हापूरमधील जनतेच्या मनात राज्य सरकारविरोधात मोठा आक्रोश आहे. कोल्हापूरकरांसाठी एकही चांगलं काम या सरकारने केलेलं नाही. महापुरात मागील सरकारने जशी मदत केली, तशी आता पुन्हा केली जावी अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र या सरकारने पूरग्रस्तांना काहीही मदत केली नाही. याचा परिणाम पोटनिवडणुकीच्या निकालात दिसून येईल,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.