23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्रआघाडी सरकारविरोधात भाजपचे आज आंदोलन

आघाडी सरकारविरोधात भाजपचे आज आंदोलन

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणा-या आघाडी सरकारच्या विरोधात भाजप उद्या (१५ सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कुटे व टिळेकर बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. गेली सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भाजप नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र, आघाडी सरकारने गेल्या ६ महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे, असेही टिळेकर म्हणाले.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणा-या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही, असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणत आहे. यासंबंधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणा-या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

आजच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार
सर्व पक्षांचे मत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले आणि आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर हा मुद्दा वाढवणे केवळ राजकीय हेतूने चालले आहे. जनतेला सगळे कळत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

मार्ग सापडला नाही, तर ओबीसी उमेदवारच द्या
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी संपूर्ण देशातील ओबीसी आरक्षण सध्या धोक्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत आमचे डेटा एकत्र करण्याचे काम आम्ही करूच. मात्र, आम्हाला अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का, याचा विचार आम्ही करू. काहीही मार्ग सापडला नाही, तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या