मुंबई : महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपने मुंबईत पोलखोल अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत मुंबईतील अनेक ठिकाणी भाजपकडून पोलखोल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, रथांवरूनही मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात भाजपकडून माहिती दिली जाणार आहे. या अभियानाचे उद्घाटन मंगळवारी भाजप नेते प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तसेच कांदिलवीमध्ये भाजपच्या स्टेजची तोडफोड करण्यात आली आहे.
तोडफोडीच्या या घटनांमुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचाच यामागे हात असल्याचा संशय भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अर्ध्या तासात आरोपींना न पकडल्यास पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार. तसेच, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिसच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सीसीटीव्ही फुटेज गायब होण्याची शक्यता – प्रवीण दरेकर
चेंबूरमध्ये पोलखोल अभियान रथाची रात्री तोडफोड करण्यात आली. शिवसेनेकडून हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील यामागे शिवसेनेचा हात आहे की नाही, हे पोलिसांनी तपासावे, असे म्हटले आहे. तसेच, पोलिसांनी आरोपींना अर्ध्या तासात पकडावे. अन्यथा पोलिस स्टेशनमध्ये जात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांना वरिष्ठांकडून तपास रोखण्याचे आदेश येऊ शकतात. यासंदर्भातील सीसी टीव्ही फुटेजही गायब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचे आवाहन केल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई पालिकेत ३ लाख कोटींचा घोटाळा!
मुंबई महापालिकेत गेल्या ५ वर्षांत शिवसेनेकडून ३ लाख कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. या सर्व घोटाळ्यांची आम्ही पोलखोल करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. या अभियानाचा समारोप १ मे रोजी सायन येथे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने होणार आहे.