35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या महापौरांविरुद्ध भाजपाचा अविश्वास प्रस्ताव !

मुंबईच्या महापौरांविरुद्ध भाजपाचा अविश्वास प्रस्ताव !

कोरोना उपाययोजनात 'भोजन से कफन तक' भ्रष्टाचार आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१० (प्रतिनिधी) सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व कंगना रनौत प्रकरणात शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपाने आणखी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेचे शक्तीस्थळ असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात सत्ताधारी शिवसेनाला अपयश आले असून, या अपयशाला मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर जबाबदार असल्याचा आरोप करताना भाजपाने आज त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांचे पाठबळ असल्याने शिवसेनेच्या सत्तेला कोणताही धोका नसल्याचे चित्र आहे.

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या, चिंताजनक मृत्यूदर आणि यानंतर पीसीआर चाचण्या वाढविण्यात पालिकेला अपयश याला सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि स्थायी समिती सदस्य प्रभाकर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. मुंबईतील कोरोना संक्रमन दर हा देशात सर्वात जास्त आहे. वांद्रे बिकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये हा दर ३७ टक्के आहे.

पालिकेने फेस मास्क, सॅनिटायझर आणि फेस शिल्डची चढल्या भावाने खरेदी केली असल्याचा आरोप करताना, शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाच्या गैरव्यवहाराचा पाढाच वाचला. गेल्या सहा महिन्यांत पालिकेची एकही सभा झालेली नाही. महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी सभा घेण्यास संमतीच दिलेली नाही. कोविड महामारीच्या सहा महिन्यांच्या काळात आरोग्य समिती सारख्या महत्वाच्या समितीची एकही बैठक झालेली नाही. विशिष्ट राजकीय पक्षाच्या ठेकेदाराला पुर्वानूभव नसतानाही कंत्राटाची खिरापत वाटल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

मुंबईकरांचे हाल !
लॉकडाऊनमुळे त्रस्त मुंबईकरांच्या माथी भरमसाठ अवाजवी बेस्टचे वीज बील मारण्यात आलेले आहे. कोरोना काळात प्रवासाचे साधन नसल्याने अनुपस्थित राहिलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. जनतेच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणही देण्यात आलेले नाही, याकडे शिंदे यांनी यावेळी लक्ष वेधले.मुंबई महानगरपालिका १८८८ च्या कलम ३६ ( ह) अन्वये महापौरांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सदस्य प्रभाकर शिंदे, ज्योती अळवणी, कमलेश यादव आणि ॲड. मकरंद नार्वेकर या नगरसेवकांच्या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या आहेत.

मुंबई महापालिकेत सध्या २२२ नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे ९५ तर भाजपचे ८३ सदस्य आहेत. याशिवाय काँग्रेस-२८, राष्ट्रवादी काँग्रेस ८, सपा-६ व मनसे-१ असे संख्याबळ आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आलाच तरी राज्यातील राजकीय समिकरणामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची व कदाचित समाजवादी पार्टीचीही साथ शिवसेनेला मिळू शकेल. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण झाले तरी शिवसेनेला अडचण येणार नाही अशी स्थिती आहे.

आ.राजूरकरांना पूणे महापालिकेचा दणका

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या