मुंबई : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपा आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून परतताच भाजपाने तातडीची बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने रणनीती आखली आहे.
यापूर्वी राज्यसभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे दिली होती. मात्र आता विधान परिषदेसाठी निवडणुकीची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी आता आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर हे तिघेही संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत.
भाजपाने विधान परिषदेत पाच उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपाने तिकिट दिले आहे. भाजपाने अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनाही संधी दिली होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज परत घेतला.