मुंबई : पेट्रोल-डिझेल, गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. स्लाईस ब्रेडच्या दरात २ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार आहे. सँडविचच्या दरातही यामुळे वाढ होऊ शकते.
स्लाईस ब्रेडच्या दरात २ ते ५ रुपयांनी वाढ झाली असून गेल्या पाच महिन्यांत ब्रेडच्या दरात दुस-यांदा वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यावर्षी खुल्या बाजारात गव्हासाठी विक्री योजना जाहीर न केल्यामुळे मे महिन्यापासूनच ही दरवाढ अपेक्षित होती, त्यानुसार आता ब्रेड महागला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे इतर सर्वच वस्तूंच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, इंधनाची दरवाढ देखील ब्रेडच्या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.
दरम्यान, ब्रेडच्या नव्या दरवाढीनुसार सुमारे ४०० ग्रॅम पांढ-या ब्रेडची किंमत ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाली आहे. तर सँडवीचसाठी स्टॉलवर वापरल्या जाणा-या ८०० ग्रॅम ब्रेडची किंमत ६५ रुपयांवरून ७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर ब्राऊन ब्रेडची किंमत ४५ रुपयांवरून ५० रुपये झाली आहे. ब्रेडच्या या दरवाढीमुळे सँडविचच्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.