मुंबई : बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणा-या खाद्यपदार्थांवर बहुचर्चित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू होणार असल्यामुळे देशात महागाईमध्ये भर पडणे अपरिहार्य आहे. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ‘मोदी सरकारच्या कृपेने आता मरण ही महाग झाले आहे’अशा शब्दांत टीका केली आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यात ते म्हणतात की, मोदी सरकारच्या कृपेने आता मरण ही महाग झाले आहे. मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही. भाजपाचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत किती व्यापक आहे हे लक्षात घ्या, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
जीएसटीचे करस्तर ठरवणा-या जीएसटी परिषदेची मागील महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत जीएसटीतून वगळण्यात आलेल्या; तसेच जीएसटी सवलत मिळणा-या अनेक वस्तूंना जीएसटी कक्षेअंतर्गत आणण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी अनेक वस्तू व सेवांवर जीएसटी वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीत याविषयीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.