मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या १९ जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा रंगणार असल्याची माहिती आहे.
येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठीची निवडणूक होणार असून त्याच्या दुस-या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार याच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र होता. महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातही अनेक बैठका झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप कधी होते, कोणते खाते कुणाला मिळेल याचा अंदाज बांधले जात होते. अखेर १९ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे-भाजपची यादी तयार?
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या तगड्या आमदार आणि मंत्र्यांसोबत मिळून भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. आता भाजपमधील प्रभावी आमदार आणि शिंदे गटातील आमदार या दोन्हींतून निवडक आमदारांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळपदी वर्णी लागेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेकदा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडून मंत्र्यांची लीस्ट तयार असून ती १९ तारखेला जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
असे असेल नियोजन?
तत्पुर्वी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू १४ जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी त्या आमदार आणि खासदारांची भेट घेतील. त्यानंतर १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल. त्यासाठी राज्यभरातील आमदार मुंबईत येतील. त्यानंतर लगेच १९ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंर्त्यांचा शपथविधी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यभरातील आमदारांना दोन-दोन वेळा मुंबईत येण्याचं काम वाचवण्यासाठी शपथविधी १९ तारखेपर्यंत लांबवण्यात आल्याची चर्चा आहे.